Friday, 16 January 2015

वणी-नांदुरी येथे भरलेल्या आदिवासी जनतेची एकता परिषद २०१५


दि. १४ व १५ जानेवारी २०१५ रोजी नंदुरी ता. दिंडोरी,नाशिक. येथे आदिवासी एकता परिषदेचे सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने ३ ते ४ लाख आदिवासी बांधवांचा जनसागर लोटला होता. महाराष्ट्रातील आणि देशातील कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव जमले होते. परंपरेनुसार लोकनृत्य, लोकगीते ढोल वाद्यांच्या गजरात कार्यक्रमास सुरुवात झाली. या निमित्ताने आदिवासीमध्ये आत्मभान आणि चैतन्य जागृत झाल्याचे दिसले. आदिवासीच्या मुखावर आनंद ओसंडून वाहत होता. आदिवासी जागा झाल्याची जाणीव यानिमित्ताने झाली. आता आम्ही फक्त ‘आदिवासी’ या एकाच शब्दाने एकवटलेले आहोत याचा प्रत्यय आला. बाकीच्या समाजाने दिलेल्या खोट्या पदव्या जसे ‘वनवासी’, ‘गिरीजन’ शब्द त्यांनी गाडून टाकले. कुणी त्यांना ‘वनवासी’ म्हणू नये किंवा तसा शब्द प्रयोग कुणी करू नये असा एकमुखी आवाज त्यांच्या एकमुखी निनादला. ‘जय आदिवासी’ एव्हढा एकाच नारा गर्जत राहिला.

           एकता परिषदेत मानवतेचे दर्शन घडले. आदिवासी भगिनी नागलीच्या भाकरी करून आपल्या बांधवांना मोफत देत होत्या.(प्रस्थापित लोकांसारखे कुपन किंवा पैसे घेतले जात नव्हते बरे.) या शिवाय लोक विना पैसा पोटभर खिचडी खात होते. हजारो लोक जेवण करत होते, तृप्त होत होते.मात्र स्वयंपाक करणाऱ्याच्या मुखावर कोणताच थकवा जाणवत नव्हता.

         आदिवासी मुळात निरुपद्रवी आहे. त्याला जीवनाचे आत्मभान आहे. याचाच परिपाक की काय या आदिवासी कार्यक्रमास बंदोबास्तास आलेल्या पोलीस यंत्रणेवर कोणताही ताण जाणवत नव्हता. आदिवासी मंत्री आपल्या बांधवांचे शत्रू कसे असतील आणि आदिवासी बांधव आपल्या मंत्र्याला कोणताही दगा किंवा त्रास देणार नाहीत याची खात्री पोलीस यंत्रणेला चांगल्या पद्धतीने झाली त्यामुळे आदिवासी बांधव निरुपद्रवी आहेत हे एकदा अधोरेखित झाले. 
           येथे भरलेल्या आदिवासी एकता परिषदेच्या निमित्ताने अनेक आदिवासी साहित्यिकांनी आपले साहित्य स्वतःच प्रकाशित केल्याने तो आता छापायला लागला आहे. त्यावर चांगल्या पद्धतीने बोलायला लागला आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासी लेखकांची पुस्तके प्रदर्शनात पाहवयास मिळाली. त्यात सर्वश्री डॉ. गोपाळ गवारी, डॉ. तुकाराम रोंगटे, वाहरू सोनावणे, नाजुबाई गावित, प्रा. अशोक बागुल अशा विविध लेखकांची पुस्तके लोकांनी मोठ्या आदरभावाने विकत घेऊन आपल्याच बांधवांच्या साहित्याचा, त्यांच्या विचाराचा गौरव केला कारण त्या साहित्यात समाजाचे दुख, त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले आहेत. विशेष म्हणजे प्रकाशित पुस्तके कुठल्या प्रकाशनाने केलेली नसून लेखकांनी ती स्वतःच्या पायावर प्रकाशित केलेली आढळली.
           या परिषदेच्या निमित्ताने आदिवासी समाज एकनिश्चयाने एकत्रित झाला, त्यांच्यात आत्मभान निर्माण झालेले आहे. मी फक्त आदिवासी आहे. आणि आमचे जीवन मानवी मूल्यावर आधारलेले आहे. असा संदेश बाकीच्या समाजापर्यंत निश्चितपणे पोहोचला जाईल. आज आदिवासी स्त्री सर्वात जास्त कष्ट करते तिच्याकडे निसर्गदत्त शक्ती आहे. परंतु तिचे शोषण यापुढे होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, तिचा सन्मान झाला पाहिजे अशा प्रकारचे विचार यानिमित्ताने प्रकट झाले.
           आदिवासीच्या योजना चांगल्या राबवल्या गेल्या पाहिजे. त्यांच्या वन्य जमिनी त्वरित नावावर झाल्या पाहिजे. योजना राबवणारा अधिकारी कर्तव्यानिष्ट स्वच्छ प्रतिमेचा, आदिवासी माणसांचा तिटकारा न करणारा, अभ्रष्ट असला तरच आदिवासीचा विकास होईल. कुपोषण, आरोग्य, शिक्षण, याकडे सरकारने गांभीर्याने विचार करून कृतीशील धोरण राबवले पाहिजे. अन्यथा नक्षलवाद, धर्मांतर, स्थलांतर, सामाजिक अशांतता असे अनेक प्रश्न वर डोके काढल्याशिवाय राहणार नाहीत. आदिवासीच्या ताटातील खिरापत सत्ताधीकाऱ्यानी वाटेल तशी वाटण्याचा अतातायीपणा करू नये, अन्यथा अनेक अनर्थ घडतील. असा गर्भित इशारा विचारवंतानी दिला आहे. आपण आपल्या लोकांना आता नाकारून चालणार नाही केवळ विशिष्ट जातींसाठी, मुठभर लोकांसाठी धोरण राबवून सत्ता चालवणे घातक ठरेल. कारण बाकीची असंख्य जनता उपेक्षित, वंचित आपण किती दिवस ठेवणार आहात, हा महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा सरकारने डोके ठिकाणावर ठेऊन कारभार करावा. कुणाचा रोष आपल्या अंगलट येतं कामा नये ही जाणीव सतत ठेवणे गरजेचे आहे. सर्वांचा विकास झाला तरच सामाजिक स्वास्थ्य व राज्य प्रगती करू शकेल यात शंका नाही.
           या कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री मा. विष्णू सावरा, माजी आ.वि. मंत्री मधुकरराव पिचड, खा.मा. हरिश्चंद्र चव्हाण, जीवा पांडू गावित, नरहरी झिरवळ, तसेच अनेक मान्यवर, संस्थांचे अधिकारी, शासकीय कर्मचारी, MSEBचे कर्मचारी विजय माळेकर, अॅड. किरण दोबाडे, व मयुरवृत्त प्रकाशनचे व्यवस्थापक अमोल गवारी, डॉ गोपाळ गवारी व इतर व्यवस्थापक उपस्थित होते. 

सौ.संगिता गवारी.
-संपादक, मयुरवृत्त प्रकाशन,
मखमलाबाद, नाशिक.




3 comments:

  1. आमचे जीवन मानवी मूल्यावर आधारलेले आहे. असा संदेश बाकीच्या समाजापर्यंत निश्चितपणे पोहोचला जाईल

    ReplyDelete
  2. कोळवाडा पुस्तक पुणे,नाशिक मध्ये कोठे मिळेल त्याची माहिती द्यावी व ऑनलाईन मिळत असेल तर ती माहिती पाठवा, laxman shingore 9922927319

    ReplyDelete